
मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाम विश्वास : 'लाडकी बहिण योजना' बंद होणार नाही, उलट अधिकाधिक विस्तारणार
मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाम विश्वास : 'लाडकी बहिण योजना' बंद होणार नाही, उलट अधिकाधिक विस्तारणार
ठाणे : लाडकी बहिण योजना कुणीही कितीही प्रयत्न केले तरी थांबणार नाही. ही योजना सतत वाढत राहील, आणि त्याचसोबत योजनेसाठीचे निधीही वाढत जातील,” असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही सुरू केलेल्या सर्व योजना जनतेच्या आहेत आणि त्या बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना जनता कायमस्वरूपी निवडणुकीत घरी बसवेल.
महाविकास आघाडीला चपराक : “लाडकी बहिण योजना त्यांना खुपते”
लाडकी बहिण योजना सुरू करताच महाविकास आघाडीकडून अडथळे उभे करण्यात आले; न्यायालयात जाऊन आक्षेप नोंदवण्यात आले. परंतु, उच्च न्यायालयाने त्यांना हाकलून लावल्याचे सांगत शिंदे म्हणाले, “लाडकी बहिण योजना त्यांच्या पोटात सलते, कारण त्यांना जनता दिलेली मदत दिसत नाही. त्यांनी योजना बंद पाडण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्यांना संधी मिळणार नाही.”
‘धनुष्यबाण’चे लोकसभेत वर्चस्व कायम
मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणूक निकालांवर भाष्य करताना सांगितले की, “मशाल विरुद्ध धनुष्यबाण यामध्ये लोकसभेत आम्ही सात जागा जिंकल्या, तर विरोधकांना फेक नरेटिव्ह करूनही अवघ्या 40% स्ट्राइकरेटवर समाधान मानावे लागले.” विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा स्ट्राइकरेट कामाच्या जोरावर अजून अधिक मजबूत राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या या ठाम भूमिकेने लाडकी बहिण योजना बंद करण्याच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. जनतेच्या हिताच्या योजना पुढे नेण्यासाठी सरकार ठाम असून विरोधकांना त्यात यश येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.