भाजपाने ‘कटेंगे तो बटेंगे’ असा नारा देत हिंदू मतपेढीला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, यावर महायुतीतीलच असलेल्या अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “हा महाराष्ट्र आहे, इथे ‘कटेंगे, बटेंगे’ चालत नाही,” असे ठणकावून सांगत अजित पवार यांनी या घोषणेचा विरोध केला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन या घोषणेचा प्रचार करत असले तरी, महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये हा नारा योग्य ठरणार नाही, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार हे आमच्या सोबत आले असले तरी त्यांना आमच्या विचारसरणीशी पूर्णपणे जुळवून घेण्यात थोडा वेळ लागणार आहे. त्यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ या घोषणेवर आक्षेप घेतला असला तरी, त्यांची भूमिका समजावून सांगण्यात आम्ही यशस्वी होऊ,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फडणवीस पुढे म्हणाले, “अजित पवारांसह सर्व महायुतीतील नेते हळूहळू आमच्या विचारसरणीत सामावून घेतले जातील. अजित पवार लवकरच भगव्या विचारसरणीचा स्वीकार करतील.”
मात्र, भाजपमधीलच पंकजा मुंडे आणि अशोक चव्हाण यांनीही या घोषणेवर नापसंती व्यक्त केली आहे. फडणवीसांनी या बाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, “या घोषणेचा अर्थ नीट समजून घेणे गरजेचे आहे. सर्वांना हे लगेच कळेलच असे नाही. आम्ही त्यांना समजावून सांगू.”
भाजपाचा हा नारा आणि त्यावर महायुतीत निर्माण झालेले वाद सध्या महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. ‘कटेंगे तो बटेंगे’ च्या राजकीय प्रभावाबाबत महायुतीतील नेत्यांमध्ये मतभेद असले तरी भाजपने हा मुद्दा रेटून धरण्याचे संकेत दिले आहेत.