वर्सोवा: लोकशाहीच्या उत्सवाला मतदारांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. आज सकाळी ७ वाजल्यापासून वर्सोवा विधानसभा मतदारसंघात मतदानास प्रारंभ झाला. सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. विशेषतः युवा मतदार आणि ज्येष्ठ नागरिकांनी मतदानामध्ये मोठा सहभाग घेतल्याचे चित्र दिसून आले.
सायंकाळी ७ वाजेपर्यंत वर्सोवा विधानसभेत सरासरी ५१.२०% मतदानाची नोंद झाली आहे. काही मतदान केंद्रांवर उशीरापर्यंत मतदान चालू होते, त्यामुळे अंतिम टक्केवारीत किंचित बदल होण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या उमेदवार भारती लव्हेकर यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार हारून खान यांचे कडवे आव्हान आहे. निवडणूक आयोगाने मतदानासाठी योग्य नियोजन केले होते. सुरक्षेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.
नागरिकांच्या उत्साहाची झलक
मतदान केंद्रावर अनेक मतदार सकाळपासूनच हजर होते. तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या मताधिकाराचा वापर केला. ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या हिरीरीने मतदान करून लोकशाहीला बळ दिल्याचे दिसून आले.